'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला दत्तू मोरेही याच शोमुळे घराघरात पोहोचला. उत्तम अभिनय आणि कॉमेडीच्या जोरावर अपार परिश्रम करत निरागस दत्तूने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. दत्तू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
गेल्यावर्षी दत्तूने स्वाती घुनागे हिच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्याच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दत्तूला पत्नीकडून खास गिफ्ट मिळालं आहे. दत्तूला पत्नीने महागडी बाईक गिफ्ट केली आहे. दत्तूने याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "फायनली...अॅनिव्हर्सरी गिफ्ट...थँक्यू सो मच बायको", असं म्हणत दत्तूने ही पोस्ट शेअर केली आहे. दत्तूच्या पत्नीने त्याला बजाज कंपनीची अॅव्हेंजर ही गाडी गिफ्ट दिली आहे. या गाडीची किंमत सुमारे १ लाखांहून अधिक आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दत्तू आणि स्वातीने २३ मे २०२३ रोजी गुपचूप लग्न केलं होतं. कोर्ट मॅरेज करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं होतं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला हास्यजत्रेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती. प्री वेडिंगचे फोटो पोस्ट करत दत्तूने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते.
दत्तूची पत्नी स्वाती ही पेशाने डॉक्टर आहे. ती स्त्री रोग आणि प्रसुतीतज्ञ आहे. काही दिवसांपूर्वीच स्वातीने तिचं स्वत:चं क्लिनिक सुरू केलं आहे. ठाण्यात स्वातीचं घुनागे क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर आहे. दत्तू अनेकदा पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतो.