‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा शो बघताना प्रत्येक जण पोट धरून असतो आणि याचं श्रेय जातं, ते या शोच्या कलाकारांना. होय, समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता, दत्तू हे हास्यजत्रेतील हास्यवीर आपल्या कॉमेडीनं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी हटके स्टाईल आहे. आपला दत्तू मोरे यालाच बघा. त्याची एन्ट्री झाली तरी चेहऱ्यावर हसू येतं. तर या ‘वन अँड ओन्ली’ दत्तू मोरेबद्दलची (Dattu More) बातमी आहे. ती वाचून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल. होय, दत्तू राहत असलेल्या चाळीला त्याचं नाव देण्यात आलं आहे. आता ही चाळ ‘दत्तू चाळ’ म्हणून ओळखली जाणार आहे.
दत्तूनं एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. एका दैनिकातील बातमीच्या कात्रणाचा फोटो शेअर करत त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत.
‘खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी... प्रेम काही वेगळंच आहे आमच्या नगरातल्या लोकांचं माझ्यावर (चाळीतल्या लोकांचं तर फारच) आणि त्या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन ज्यांनी आजपर्यंत मला आज एवढं प्रेम दिलं, कौतुकाची थाप दिली... असंच प्रेम करत रहा... तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच ऊर्जा येते... आणि ह्यात अजून एक मोठा वाटा आहे ते आमच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा फॅमिलीचा आणि सोनी मराठी चॅनलचा... थँक्यू...,’अशी पोस्ट दत्तूने शेअर केली आहे.
दत्तूच्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी त्याचं अभिनंदन करत, त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा शब्दांत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
‘ महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमधील दत्तू हा मुळचा ठाण्याचा आहे. वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या एका चाळीत त्याचं बालपण गेलं. या चाळीनं दत्तूला मोठं होतांना पाहिलं. त्याला स्टार होताना पाहिलं. आपल्या चाळीतला एक पोरगा इतका मोठा माणूस झालं, याचं कौतुक सगळ्यांनाच आहे आणि याचमुळे दत्तूच्या चाळीचा ‘दत्तू चाळ’ हे नाव देण्यात आलं आहे. आत्तापर्यंत कोणतही नाव नसलेली ही चाळ यापुढे दत्तूच्या नावानं ओळखली जाणार आहे. चाळीला आपलं नाव दिलं जावं, याचा आनंद दत्तूच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. या ऋणातून तो कधीही मुक्त होऊ इच्छित नाही. लोकांचं हे प्रेम मला आणखी ऊर्जा देतं, असं तो म्हणतो.