'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना संधी देत त्यांच्यातील हरहुन्नरी अभिनेते घडवले. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे गौरव मोरे. अनेक वर्ष वेगवेगळे विनोदी शो आणि स्टँड अप कॉमेडी केल्यानंतर गौरवला हास्यजत्रेची संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं केलं आणि फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवली. दमदार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या गौरवने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं.
हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेल्या गौरवचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शूटिंगसाठी सांगलीत गेलेल्या गौरवने त्याच्या चाहत्यांचा अनुभव सांगितला आहे. फिल्टरपाड्याच्या बच्चनची सांगलीतही क्रेझ पाहायला मिळाली. गौरव एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने सांगलीत गेला होता. शूटिंग लोकेशनच्या बाजूलाच एक शाळा होती. शाळेतील गौरव मोरे आल्याचं समजताच ते रोज फोटो आणि सहीसाठी गर्दी करायचे. एक दिवस गौरवपुढे सहीसाठी शाळेतील मुलांच्या वह्यांचा ढीगच लागला होता. चाहत्यांचं हे प्रेम पाहून गौरवही भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावरुन याचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
गौरवने मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'बॉईज ४' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी गौरव 'हवाहवाई', 'विकी वेलिंगकर', 'बाळकडू' या चित्रपटांतून छोट्या भूमिकेत झळकला होता.