‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे गौरव मोरे (Gaurav More ). सध्या गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अशीच गौऱ्याची एक चाहती त्याला भेटायला आली आणि गौरव समोर दिसताच ढसाढसा रडू लागली. गौरवने याचा इमोशनल व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.‘खूप प्रेम दिलंय तुम्ही आम्हाला... अशावेळी काय बोलावं तेच कळत नाही...,’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गौरव त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे. एक चाहती तिथे त्याला भेटायला येते. त्याच्याबरोबर सेल्फी घेते आणि अचानक रडू लागते. चाहतीचं हे प्रेम पाहून गौरव तिला प्रेमानं मिठी मारतो. आपल्यावर चाहते इतकं प्रेम करतात, हे पाहून तो भारावून जातो. गौरवचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याला असंच भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पवई फिल्टरपाडामध्ये राहणाऱ्या गौरवने अनेक एकांकिका स्पर्धा, युथ फेस्टिवल त्याने गाजवले. हे सगळं करत असताना ‘जळू बाई हळू’ या नाटकात अभिनेता आनंदा कारेकरचा बदली कलाकार म्हणून तो काम करत होता.‘जळू बाई हळू’ या नाटकात काम सुरू असतानाच प्रसाद खांडेकर यांच्या पडद्याआड या एकांकिकेसाठी गौरव काम करू लागला आणि याच एकांकिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली.माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता.
मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात गौरव मोरेच्या एण्ट्रीला एक विशिष्ट प्रकारचं म्युझिक वाजवलं जातं. अन् त्यानंतर फिल्टर पाड्याचा बच्चन अशी त्याची ओळख करुन दिली जाते. आता हे फिल्टर पाडा म्हणजे नेमकं आहे तरी काय?
तर फिल्टर पाडा ही आरे कॉलनीमधील एक जागा आहे. सभोवताली जंगल आणि त्यामध्ये एक लहानशी वस्ती असं या जागेचं स्वरुप आहे. याच भागात गौरवचं बालपण गेलं. त्यामुळं त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन असं म्हणतात. अमिताभ बच्चन हे गौरवचे आवडते अभिनेते आहेत. त्याला बिग बींची ‘हम’ चित्रपटातील स्टाईल मारायला खूप आवडते. त्याची ही एण्ट्रीची शैली ‘हास्य जत्रे’च्या लेखकांना प्रचंड आवडली. त्यामुळं त्याला त्याच शैलीत त्यांनी एण्ट्री मारण्यास सांगितली आणि तो फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून लोकप्रिय झाला.