आज घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे गौरव मोरे (gaurav more). महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे गौरवला प्रचंड लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे विनोदवीर होऊन प्रेक्षकांना हसवणारा गौरव मराठी सिनेमांमध्येही झळकला आहे. त्यामुळे अभिनेता म्हणूनही तो नावलौकिक मिळवत आहे. अभिनयामुळे चर्चेत येणारा गौरव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या हेअर कटमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच एका कार्यक्रमात गौरवने त्याचा हेअरकट करण्यामागचं कारण सांगितलं.
“आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” गौरवचं हे वाक्य प्रचंड गाजलं आहे. त्यामुळे फिल्टर पाडा या टोपणनावानेही तो बऱ्याचदा ओळखला जातो. या वाक्याप्रमाणेच त्याची हेअर स्टाइलदेखील त्याची एक ओळख होती. मानेवर येणारे त्याचे झुबकेदार केस हवेत उडवून तो प्रेक्षकांची वाहवाह लुटायचा. परंतु, त्याची ही हेअरस्टाइल त्याने अलिकडेच बदलली. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याने असं का केलं? हा प्रश्न पडला आहे. याचं उत्तर त्याने नुकतंच दिलं आहे.
"माझ्या आगामी सिनेमासाठी मी केस कापले आहेत. पण फक्त दोन महिने..मी पुन्हा माझ्या जुन्या रुपात प्रेक्षकांना दिसेन. मी केस कापल्यावर अनेक जण नाराज झाले. मी असं करायला नको होतं असं सांगितलं. मात्र, कामासाठी मला केस कापावे लागले', असं गौरव म्हणाला.
दरम्यान, गौरव लवकरच अंकुश या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उद्गीरकर, केतकी माटेगांवकर हे कलाकार झळकणार आहेत. इतकंच नाही तर या सिनेमाबरोबरच तो एका बॉलिवूड सिनेमातही झळकणार आहे.