Join us

'मी हा असा तरी तू..' ; 'या' एका कारणामुळे वैशालीने दिला अरुण कदम यांना लग्नासाठी होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 10:37 IST

Arun kadam: वैशालीने लग्नासाठी जबरदस्तीने किंवा नाइलाजाने होकार दिला, असं अरुण कदम यांना वाटत होतं.

विनोदाच्या हटके स्टाइलमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे अरुण कदम (arun kadam). उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा हा अभिनेता आज दादूस या नावानेही ओळखला जातो. अरुण कदम यांनी अथक मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे स्वभावातील साधेपणामुळे ते चाहत्यांना कायम आपलेसे वाटतात. म्हणूनच त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. यामध्येच नुकताच त्यांनी त्यांच्या वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे.

अरुण कदम यांनी वैशाली हिच्याशी लग्न केलं आहे. एखाद्या अभिनेत्री इतक्याच वैशाली सुंदर दिसतात. त्यामुळे त्यांची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते. वैशाली आणि अरुण कदम यांचं लव्ह मॅरेज आहे असं अनेकांना वाटतं. मात्र, या जोडीचं अरेंज मॅरेज झालं आहे. विशेष म्हणजे वैशालीने अरुण यांच्याशी लग्न करण्यामागेही एक खास कारण आहे.  लग्न ठरल्यानंतर अरुण कदम यांना प्रश्न पडला होता की, 'आपण साधारण दिसत असतांना सुंदर दिसणाऱ्या वैशालीने आपल्याला होकार कसा दिला?' हा प्रश्न त्यांनी वैशाली यांनादेखील विचारला. त्यावेळी वैशाली यांनी दिलेलं उत्तर खास होतं.

अरुण कदम मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होते. सोबतच ते कलाविश्वातही नशीब आजमावत होते. या काळात त्यांच्या एका मित्राने वैशालीचं स्थळ अरुण यांना सुचवलं. त्यानंतर अरुण कदम वैशाली यांना पाहायला गेले. पाहताच क्षणी वैशाली, अरुण यांना आवडली होती. तर, वैशाली यांच्या वडिलांनीही अरुण कदम यांना जावई म्हणून पसंती दिली होती. परंतु, वैशाली सुंदर दिसतानाही तिने आपल्याला होकार का दिला हा प्रश्न त्यांच्या मनात होता. अखेर त्यांनी हा प्रश्न थेट वैशाली यांना विचारला.

गोरेगाव येथे असलेल्या छोटा काश्मीर येथे अरुण कदम आणि वैशाली भेटले. त्यावेळी मी असा साधारण बेताची परिस्थिती असलेला आणि तू इतकी सुंदर तरी या लग्नासाठी होकार कसा काय दिलास? कोणता दबाव नाही ना? असा प्रश्न अरुण कदम यांनी विचारला. त्यावर, हे लग्न जबरदस्तीने होत नाहीये. माझे वडील सांगतील त्या मुलासोबत लग्न करायला मी तयार होते, असं उत्तर वैशाली यांनी दिलं. 

दरम्यान, वैशाली यांचा होकार मिळाल्यानंतर अरुण कदम यांचं थाटात लग्न झालं. लग्नाच्यावेळी अरुण यांची परिस्थिती बेताची होती. मात्र, हळूहळू करत त्यांना कलाविश्वात ओळख मिळाली आणि त्यांचा इंडस्ट्रीतला प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमहाराष्ट्राची हास्य जत्रा