'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिचा ४ वर्षांचा चिमुकला रुद्राज मराठीचं महत्व तिला समजावून सांगतोय. आपल्या बोबड्या भाषेत का होईना पण या चिमुकल्याने मोलाचा संदेश दिला आहे. म्हणूनच लेकाचा अभिमान असल्याची पोस्ट नम्रताने केली आहे.
आपली आई भारतात असून इंग्रजीत बोलतेय हे ऐकून नम्रता संभेरावचा मुलगा तिला समजवताना दिसतोय. नम्रताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये चिमुकला रुद्राज म्हणतो,'आई अमेरिका नाही ही ...ही इंडिया आहे..इंडियात सगळे मराठीच बोलतात..आणि तू...हे बोलते इंडियात इंग्लिश? इंग्लिश नाही बोलायचं..मराठीच बोलायचं.' नम्रताने या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय. रुद्राजचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
'माझ्या बाळाची मराठी बद्दलची आत्मियता आणि प्रेम बघून खूप अभिमान वाटला. मराठी माध्यमं लोप पावत चालली आहेत ह्याची खूप खंत वाटते आमच्या आसपास मराठी माध्यम नाही ही वाईट परिस्थिती आहे' असं कॅप्शन नम्रताने व्हिडिओखाली दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच नम्रता हास्यजत्रेच्या टीमसोबत अमेरिका दौऱ्याहून परतली आहे. आई इंग्रजीत बोलतेय हे पाहून मुलगा स्वत:च आईला मराठीत बोल असं समजावताना दिसतोय हे असं फारच क्वचित घडत असेल. चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत रुद्राजचं कौतुक केलं आहे.