Join us

"मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले", वडिलांच्या आठवणीत प्रसाद खांडेकर भावुक, म्हणाला, "ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 3:32 PM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांबद्दल बोलताना प्रसाद भावुक झाला.

विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. विनोदाची डबल डेकर अशी ओळख मिळवणारा प्रसाद उत्तम नट आहे. अभिनेता असण्याबरोबरच प्रसाद लेखक, दिग्दर्शकही आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा चेहरा बनलेल्या प्रसाद खांडेकरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्टची माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. 

प्रसादने नुकतीच सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. यावेळी वडिलांच्या आठवणीत प्रसाद भावुक झाल्याचं पाहायला मिळतं. प्रसाद म्हणाला, "मी १४ वर्षांचा असताना बाबांचं निधन झालं. वाचनाची आवड मला त्यांच्यामुळे लागली. मी लहानपणी ठकठक, चंपक, चांदोबा हे सगळं वाचायचो. तेव्हा बाबांनी मला मराठी ग्रंथ संग्राहालय जॉइन करून दिलं. पण, त्या ग्रंथालयातूनही मी तशीच पुस्तक आणायचो. तेव्हा एकदा दुपारी बाबा मला ओरडले होते. याच्यासाठी मी तुला ग्रंथालय जॉइन करून दिलेलं नाही. तुला वाचनाची आवड आहे, तर वेगळी पुस्तकं वाच. असं ते मला म्हणाले होते." 

"मला त्यांनी रामचंद्र सडेकर यांचं सोनेरी टोळी हे पुस्तक घेऊन ये आणि वाच, असं सांगितलं होतं. ते पुस्तक नेहमी कोणाकडे तरी असायचं. त्यामुळे ग्रंथालयात ते वाचायला मिळत नव्हतं. एकदा ते पुस्तक मला सापडलं आणि मी ते घरी घेऊन आलो. मला माझ्या बाबांना ते दाखवायचं होतं. पण, घरी आल्यावर कळलं की बाबा कामावर गेले आहेत. बाबा कामावरुन आल्यावर दुधाच्या डेरीवर जायचे. मी तिथे गेलो, पण कळलं की बाबा घरी गेलेत. मग मी सायकलवरून घरी गेलो तर कळलं की बाबा शाखेत गेलेत. माझे बाबा तेव्हा शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. मी शाखेत गेलो, तर कळलं की दुसऱ्या दिवशी असणाऱ्या सेनेच्या सप्ताहसाठी बाबा गेले आहेत. मी तिथे गेलो तर कळलं की बाबा तिथूनही निघून गेले आहेत. त्यानंतर रात्री अचानक कळलं की बाबांचं निधन झालंय. ते पुस्तक त्यांना शेवटपर्यंतचं दाखवायचं राहिलं," असं म्हणत प्रसादने खंत व्यक्त केली. 

दरम्यान, प्रसादने अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलं आहे. त्याचं 'कुर्रर्र' हे नाटक सध्या गाजत आहे. हास्यजत्रेतील अनेक स्किटचं प्रसाद लेखन आणि दिग्दर्शन करतो. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता