Join us

Prasad Khandekar: 'सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात..', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने आईसाठी लिहिली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 1:29 PM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसादनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या शोमधील विनोदवीरांची चर्चा नेहमीच होत असते. या कार्यक्रमातील असाच एक विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी प्रसाद खांडेकरची ओळख आहे. हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. कित्येक वर्षांपासून प्रसाद चाहत्यांचं मनोरंजन करतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसादनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रसादने बर्थ डे सेलिब्रेशन करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना प्रसादने एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

प्रसाद खांडेकरची खास पोस्ट''Happy wala birthday आई वाढदिवसाची नक्की डेट माहीत नसणाऱ्या करोडो लोकांचा घोषित वाढदिवस 1 जून ला साजरा होतो तसाच तुझा ही साजरा होतोय आई. नक्की वय तुला ही सांगता येणार नाही. आणि नकोच मोजूस. कारण मला अजून ही तू तशीच तरुण वाटतेस. जशी मला माझ्या लहानपणी वाटायचीस.अजून ही रात्री शूट वरून प्रयोगावरून किती ही लेट होउदे.. वाट बघत जागीच असतेस.. कधी कधी वैतागतो मी की का एवढ्या रात्री लेट पर्यंत वाट बघत जागी राहतेस.  पण कधी चुकून तुझा फोन नाही आला तर मलाच चुकल्यासारख वाटत..आणि मग मीच फोन करून विचारतो फोन का नाही केलास आई.''

पुढे प्रसाद लिहितो, ''बाबू जरा वजन कमी कर म्हणत दोन पोळ्या जास्तीच्या तूच वाढतेस..भाताने शुगर वाढते बोलतेस पण मला आवडतो म्हणून थोडा तरी डाळभात बळेच खाऊ घालतेस.. सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात तसे मला ही माहीत आहेत पण श्लोक ज्या वेळी अल्पाच्या पोटात होता त्यावेळी तू माझ्यासाठी सोसलेल्या कष्टाची पुन्हा नव्याने जाणीव झाली आई happy wala birthday तुला खुप खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप खुप पप्प्या..'' 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटी