Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी मुंबईत घर आता खरेदी केली महागडी कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:22 AM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, म्हणतो- "स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या या शोने कित्येक नवोदितांनाही त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली आहे. हास्यजत्रेतूनच अभिनेता पृथ्विक प्रताप घराघरात पोहोचला. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या पृथ्विकला हास्यजत्रेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. पृथ्विकचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नुकतंच त्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. 

पृथ्विक सोशल मीडियावरुन नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सबद्दल चाहत्यांना माहिती देत असतो. महागडी कार घेतल्याची गुडन्यूजही त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. पृथ्विकने kia ही नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. नव्या गाडीचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये पृथ्विकच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद स्पष्ट दिसत आहे. गाडीचे फोटो शेअर करत पृथ्विकने पोस्टही लिहिली आहे. "पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे तो म्हणतो, "पहिलं हे नेहमीच स्पेशल असतं, म्हणून...सिरी "आले तुफान किती..." हे गाणं लाव". त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीने पृथ्विकच्या पोस्टवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. "कर्तुत्ववान आहेस.. सच्चेपणा आणि मेहनत अशीच असू देत...खूप प्रेम", अशी कमेंट जितेंद्र जोशीने केली आहे. 

दरम्यान, गेल्याच वर्षी पृथ्विकने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं होतं. आता त्याने त्याचं गाडी घेण्याचं दुसरं स्वप्न पूर्ण केलं आहे. पृथ्विकने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'जागो मोहन प्यारे', 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही त्याने काम केलं आहे. 'डिलिव्हरी बॉय' या मराठी सिनेमातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारपृथ्वीक प्रतापमराठी अभिनेता