Join us

VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 3:43 PM

Prithvik Pratap , Brahmastra : काहींना ‘ब्रह्मास्त्र’ आवडला तर काहींनी हा चित्रपट पाहून नाक मुरडलं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने ‘ब्रह्मास्त्र’वर एक पोस्ट केली आहे.

आलिया भट व रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 12 दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण 202 कोटींची कमाई केली. तर पाचही भाषेत एकूण 221.21 कोटींचा बिझनेस केला. खरं तर सोशल मीडियावरचा ‘बायकॉट ट्रेंड’ बघता हा सिनेमा इतकी कमाई करेल, याबद्दल सगळेच साशंक होते. पण प्रत्यक्षात चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींनी तो पाहून नाक मुरडलं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम (Maharashtrachi Hasya Jatra) पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap ) ‘ब्रह्मास्त्र’वर एक पोस्ट केली आहे.

  पृथ्वीकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो अंधारात  उभा आहे आणि विविध रंगाच्या लाईटचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘कुछ नहीं वो ब्रह्मास्त्र का क्लासमॅक्स देश रहा हूं,’असं या व्हिडीओवर लिहिलं आहे.  ‘फिल्म का नाम इंद्रधनुष भी चल जाता,’असं कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं आहे. त्याच्या या भन्नाट पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. फार काही नाही, पण तुझ्या कॅप्शनसाठी एक हार्ट तर दिलंच पाहिजे, असं एकाने लिहिलं आहे. भावा, माझं पण काही असंच झालं, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. मी लहान असताना अशी लाईट माझ्या घड्याळात होती, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. सुपर्ब क्रिएटीव्हिटी भाई, म्हणत अनेकांनी पृथ्वीकच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता  पृथ्वीक प्रताप काम करताना आपल्या वडिलांचं नाव लावतो. मात्र त्याचं पूर्ण नाव  पृथ्वीक प्रताप कांबळे असं आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेपासून त्यानं अभिनयाला सुरुवात केली. पुढे यूथ फेस्टिव्हल, पथनाट्य, एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक नाटक, हास्यजत्रा अशा विविध ठिकाणी त्यानं अभिनय कौशल्याची कमाल दाखवली. काही काळ त्यानं नोकरीही केली. परंतु त्यात तो रमला नाही. त्यानंतर  जागो मोहन प्यारे  या मालिकेतील  राहुल  या विनोदी व्यक्तिरेखेमुळे पृथ्वीक महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला.

 

टॅग्स :पृथ्वीक प्रतापब्रह्मास्त्रमहाराष्ट्राची हास्य जत्रा