'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेन्ट दाखवण्याची संधी मिळाली. हास्यजत्रेतून प्रसिद्धीझोतात आलेली अशीच एक गुणी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. विनोदाचं अचूक टायमिंग आणि दमदार अभिनयाने प्रियदर्शनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रियदर्शनी पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसते. सध्या तिच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
प्रियदर्शनीने नुकतेच काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून त्यावर पांढऱ्या रंगाचं ब्लेझर घालून क्लासी लूक केला होता. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले होते. परंतु, या फोटोंवरुन एका नेटकऱ्याने प्रियदर्शनीला आक्षेपार्ह मेसेज केले होते. "हॉटनेस दाखव की दडून का ठेवलास...ब्लॅक ड्रेसमध्ये फिगर दाखव", असे अश्लील मेसेज प्रियदर्शनीला नेटकऱ्याने केले होते. याचा स्क्रीन शॉट शेअर करत प्रियदर्शनीने त्याचं अकाऊंट रिपोर्ट करण्याची मागणी केली आहे. याबरोबरच तिने नेटकऱ्यालाही सुनावलं आहे.
प्रियदर्शनीने यावरुन एक सविस्तर पोस्टही लिहिली आहे. "अर्थात अशा कमेंट्स, मेसेज येणार! फोटो टाकतानाच कळायला पाहिजे. अनेक पुरुष अशा फोटोंवर खूप चांगली कमेंटही करतात. एखादा फोटो हॉट वाटणं आणि ते व्यक्त करणं ही गोष्ट आक्षेपार्ह नाही. पण, अशा पद्धतीचे मेसेज नक्कीच आक्षेपार्ह आहेत. आणि ते इग्नोर करत राहिलो तर सवयीचं होईल. म्हणून हे सगळं लिहिणं. आणि या उपर फोटोचा काही संबंध नसतानाही असे अनेक मेसेज अनेक मुलींना येत असतात. काही प्रमाणात मुलांनाही येत असतात. तर या सोशल मीडियाच्या निनावी जनतेला तसं तर आपण काही करू शकत नाही. फक्त आपल्या बाबतीत रिपोर्ट करू शकतो," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेल्या प्रियदर्शनीने मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'फुलराणी' या मराठी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. शाहीद कपूरच्या फर्जी या वेब सीरिजमध्येही प्रियदर्शनी झळकली होती.