Join us

इंजिनियर आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी, अभिनयासाठी नोकरी सोडली, म्हणाली, "१५ दिवस नोकरी करून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 2:59 PM

अभिनय क्षेत्रात येण्याआधी प्रियदर्शनी एके ठिकाणी नोकरी करत होती. अभिनयासाठी नोकरी सोडल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचली. प्रियदर्शनीने चित्रपट, वेब सीरिज आणि मालिका अशा सगळ्याच अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी सोडली नाही. विविधांगी भूमिका साकारून तिने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, अभिनय क्षेत्रात येण्याआधी प्रियदर्शिनी एके ठिकाणी नोकरी करत होती. अभिनयासाठी नोकरी सोडल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

प्रियदर्शनीने या मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील करिअरबाबत भाष्य केलं. खुमासदार अभिनयाने प्रेक्षकांना हास्याचे डोस देणाऱ्या प्रियदर्शनीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. दहावीनंतर प्रियदर्शनीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवायचे होते. पण, कुटुंबीयांच्या आग्रहाखतर तिने इंजिनिअरिंग केलं. पण, इंजिनिअरिंगबरोबरच नाटकही करणार, असं प्रियदर्शनीने कुटुंबीयांना सांगितलं होतं. NSDमधून शिक्षण घेण्याबाबत प्रियदर्शिनी म्हणाली, "एनएसडीला जायचं हे मी दहावीतच ठरवलं होतं. तिथे प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची मी माहितीही काढली होती. मी प्रवेशपरिक्षाही दिली होती."

"त्याआधीच मला इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली होती. १५ दिवस मी नोकरी केली. एनएसडीला जाण्यासाठी नोकरी सोडावी लागेल, म्हणून मी आधीच राजीनामाही दिला होता. पण, एनएसडीला केवळ २६ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. आणि मी उत्तीर्ण झालेली २७वी विद्यार्थिनी होते. एनएसडीमध्ये प्रवेश घेण्याची माझी संधी हुकली आणि नोकरीही गेली. त्यानंतर मग वर्षभराने महाराष्ट्राची हास्यजत्रेसाठी माझी निवड झाली. मी एनएसडीला जाऊ शकले नाही. पण, त्यापेक्षा बरंच काही मला हास्यजत्राच्या मंचाने दिलं आहे, " असं प्रियदर्शनीने 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

प्रियदर्शनी 'शांतीत क्रांती'च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याआधी ती शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमध्ये झळकली होती. 'फुलराणी' या चित्रपटातही प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत होती. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता