Join us

"मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:26 PM

"मी मराठीतही टॉपची अभिनेत्री बनू पाहू शकते...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरचं वक्तव्य चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. उत्तम अभिनय आणि अचूक टायमिंग साधत हास्याचे फव्वारे उडवणारी प्रियदर्शिनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवल्यानंतर प्रियदर्शिनी 'फुलराणी' या मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसली. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. मुळची पुण्याची असलेल्या प्रियदर्शिनीने कलाविश्वात काम करण्यासाठी मुंबई गाठली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शिनीने तिचा अभिनय विश्वातील प्रवास सांगतिला. 

याबरोबरच तिने बॉलिवूडमध्येही काम करण्याविषयी तिचं स्पष्ट मत मांडलं. प्रियदर्शिनीने नुकतीच 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये तिला "सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांनी हिंदीत काम केलं आहे. त्यांना बघून मला पण यांच्यासारखं व्हायचंय, असं वाटतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियदर्शिनीने तिचं मत मांडताना मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही असं बेधडक वक्तव्य केलं. 

"मला सई ताम्हणकर व्हायचंय, असं आपल्याला वाटूच शकतं. पण, आपल्याला कुणासारखं तरी व्हायचं आहे, असं वाटणं हे समोरच्याचं क्रेडिट आहे. मला कॉपी नाही करायचंय...पण, तिथपर्यंत पोहोचायचं आहे ही स्वप्न नक्कीच बघितली जातात. मला वाटतं फक्त हिंदी नव्हे तर तमिळ वगैरे अश सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करावं. आपल्याकडे सध्या हिंदीचं खूप आकर्षण आहे. मग तू हिंदीत का नाही काम करत, असं विचारतात. पण, मी मराठीत काम करतेय ना...मी मराठीतही टॉपची अभिनेत्री बनू पाहू शकते. मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाहीये," असं प्रियदर्शिनी म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "आपल्या हक्काचं व्यासपीठ सोडून झगमगाट जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा चांगल्या कामासाठी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करावं. मला मराठी प्रेक्षकांना जास्त कंटेंट द्यायला आवडेल. जर, मी हिंदीत काम केलं तर तिथे जे मी अनुभवलं ते मराठी प्रेक्षकांना द्यायला आवडेल. बाहुबलीसारखा चित्रपट मराठीत यावा, असं मला जास्त वाटतं. मी त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा तो कंटेंट आपल्याकडे यायला हवा, असं मला वाटतं."

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारसेलिब्रिटी