Join us  

होय हे आमचं घर आहे! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेने मुंबईत खरेदी केलं नवं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 9:34 AM

"ही हिंमत हास्यजत्रेने दिली", मुंबईत घर खरेदी केल्यानंतर रोहित माने भावुक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या हास्यजत्रेच्या विनोदवीरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. हास्यजत्रेने अनेक नवोदित कलाकारांना संधी देत उमदे विनोदवीर घडवले आहेत.  अशाच हास्यवीरांपैकी एक म्हणजे रोहित माने. उत्तम अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर रोहितने अल्पावधतीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या रोहितने मेहनतीने कलाविश्वात जम बसवला. करिअरबरोबरच त्याने वैयक्तिक आयुष्यातही आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

रोहितने नुकतंच मुंबईत स्वत:चं नवीन घर खरेदी केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करत नव्या घराची छोटी झलक दाखवली आहे. त्याबरोबरच त्याने फोटोही शेअर करत नवीन घराबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 

मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमीत्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहीलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून रहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं...जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. 

बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही. पण, श्रदधा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालंय. ही हिंमत आम्हाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो...होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. ह्या सगळयात माझे आई वडील, माझे सासू सासरे, ह्यांनी कायमचं आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून...

रोहितच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या रोहित 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही मालिकांमध्येही तो झळकला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता