Join us

'साईबाबांनीच मोदींना बसवलं...' सुरेश वाडकरांचे शब्द ऐकून हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने लगावला टोला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:33 IST

'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी सुरेश वाडकरांना मोजक्या शब्दात टोला लगावलेला दिसतोय (maharashtrachi hasyajatra, suresh wadkar)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो. गेली चारहून जास्त वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी राजकीय - सामाजिक परिस्थितीवर त्यांच्या खास शैलीत पोस्ट करत असतात. अशातच गोस्वामींनी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकरांना खास टोला लगावला आहे. 

सचिन गोस्वामींनी सुरेश वाडकरांना उद्देशून पोस्ट केलीय. गोस्वामी लिहीतात, "पुढील "महाराष्ट्र भूषण" (तुजं नमो गायक) सुरेश वाडकर..... एक अंदाज." अशी पोस्ट केलीय. सचिन गोस्वामींच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ही पोस्ट वाचून सचिन गोस्वामींनी सुरेश वाडकरांना टोला लगावल्याची चर्चा आहे.

सुरेश वाडकर यांनी काहीच दिवसांपुर्वी शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली आणि म्हणाले, "मला राजकारणातलं काहीही कळत नाही.  मी गाणं गाणारा माणूस आहे. मला वाटतं, साईबाबांनीच मोदींना बसवलं आहे, त्यामुळे पंतप्रधान सर्वकाही चांगलं कार्य करतील. याशिवाय मला वाटतं की देवी - देवतांनीच पंतप्रधान मोदींची नियुक्ती केली आहे." सुरेश वाडकरांच्या या वक्तव्यावर 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी टोला लगावल्याची चर्चा आहे.

टॅग्स :सुरेश वाडकर महाराष्ट्राची हास्य जत्रापी. एम. नरेंद्र मोदीनरेंद्र मोदी