'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर चौघुले (samir choughule). उत्तम अभिनयशैलीसह लेखन कौशल्य लाभलेला समीर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्यामुळे बऱ्याचदा समीर त्याच्या सहकलाकारांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. यात नुकतीच त्याने या कार्यक्रमातील अभिनेत्री इशा डे (esha dey) हिच्याविषयी पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने ज्या हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
“ईशा वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्यावर्षीच आमच्या ‘हास्यजत्रे’मध्ये दाखल झालेला तगडा गडी. फारच कमी वेळात हिने हास्यजत्रेच्या वातावरणाशी जुळवून घेतलं. सहज सुंदर विनोदाची शैली आणि अत्यंत अप्रतिम आवाजाची दैवी देणगी लाभलेली आमची ईशा ही लंडन ड्रामा ग्रॅज्युएट आहे. अगदी ब्रिटिशांचं इंग्रजी बोलू शकणारी आमच्या हास्यजत्रेतली ही एकमेव कलाकार”,असं समीरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
समीर चौघुलेंसाठी पहिला पगार होता खूपच खास; आई-वडिलांसाठी घेतलं होतं 'हे' गिफ्ट
पुढे तो लिहितो, “हिच्या डे आडनावावरून ही लोकांना बंगाली वाटते. पण ही महाराष्ट्रीयनच आहे. पण मग ती डे आडनाव का लावते? हा प्रश्न कृपया तिलाच विचारावा. स्वभावाने लोभस आणि तितकाच खट्याळपणा (किडे) जोपासणारी. आयुष्यात थोडं चांगलं किंवा थोडं मन हलवणार समोर घडलं की लगेच हिचे डोळे पाणवतात. कदाचित हळवेपणा हेच तिच्या स्वाभाविक अभिनयाचं मूळ आहे.. आमच्या दोघांची जोडी स्किटमध्ये बेफाम फुलते. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा”. ईशाला तिचे चाहते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात इशा सहभागी झाल्यापासून तिने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यश मिळवलं आहे. त्यामुळेच आज ती घराघरात लोकप्रिय असल्याचं दिसून येतं.