कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे (prabhakar more). आपल्या अभिनयातून, विनोदातून प्रभाकर मोरे कायमच त्यांची कोकणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच होळीच्या निमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ब्रेक घेत त्यांनी थेट त्यांचं गाव गाठलं आहे. इतकंच नाही तर गावात गेल्यानंतर मानाची पालखीदेखील त्यांनी नाचवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोकणात शिमगा हा सण मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक चाकरमानी होळीच्या सणाला आवर्जुन आपल्या गावी जातात. याला प्रभाकर मोरेदेखील अपवाद नाही. शिमग्याचा सण असल्यामुळे तेदेखील आपल्या गावी रवाना झाले. इतकंच नाही तर, त्यांनी गावची मानाची पालखीदेखील नाचवली. या पालखीसोहळ्याचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, प्रभाकर मोरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर त्यांचं शालू हे गाणंदेखील सुपरहिट आहे.