गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटीही याबाबत सोशल मीडियावरुन त्यांचं मत मांडताना दिसत आहेत.
आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. "रक्षाबंधन आणि भाऊबीज ह्यांसारखे सण त्यांच्यासाठी नसतीलच ...त्यांच्या स्वतःच्या आया बहिणी तरी कश्या जातील त्यांच्या जवळ...", असं प्रसादने पोस्टमध्ये म्हटलं आहे. बदलापूर आणि कोलकाता प्रकरणाचा आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रसादने निषेध करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच बदलापूर शहरात संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 12 आणि 13 ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
या घटनेनंतर बदलापूरमधील नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलं होतं. संतप्त जमावाने रेल्वेमार्गातर ठिय्या धरला होता. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प होती. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तर आंदोलकांनी दगडफेकीने प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत ४ पोलिस व १२ आंदोलक जखमी झाले.