कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे (prabhakar more). आपल्या अभिनयातून, विनोदातून प्रभाकर मोरे कायमच त्यांची कोकणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच मराठी कलाविश्वात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. आजवर प्रभाकर मोरेंनी अनेक कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. मात्र, पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या लेकीसोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली.
प्रभाकर मोरे कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या लेकीसोबत स्क्रीनवर काम केल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांच्या लेकीने कलाविश्वात पदार्पणही केलं आहे.
“‘परदा’ लघुपट. माझ्या लेकीचा पहिलाच प्रोजेक्ट आणि तो ही माझ्याबरोबर. खूप अभिमान वाटतोय”, असं कॅप्शन देत प्रभाकर मोरे यांनी काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांची लेक स्क्रीनवर त्यांच्यासोबतचे काही फोटो दाखवतांना दिसत आहे. दरम्यान, प्रभाकर मोरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर त्यांचं शालू हे गाणंदेखील सुपरहिट आहे.