Join us

’दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता, लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 4:56 PM

सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लवकरच ज्योतिबाचं महात्म्य सांगणारी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोक दैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस लवकरच पूर्ण होणार आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारणार आहे.या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून २० दिवसांत १२ किलो वजन वाढवलं आहे.

मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना निर्माते महेश कोठारे म्हणाले, ‘या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरु आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हे देखिल आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मुंबईहून ट्रान्सपोर्ट कराव्या लागल्या.

यासोबत निलीमा कोठारे आणि नीता खांडके यांच्या एन क्रिएशन्सचं सुद्धा कौतुक ज्यांनी खूप रिसर्च करुन मालिकेसाठी पोशाख आणि दागिने तयार केले आहेत. हे करताना अनेक पोथ्यांचे दाखले घेण्यात आले आहेत. मालिकेला या सगळ्या गोष्टी वेगळ्या उंचीवर नेतील याची खात्री आहे.’

टॅग्स :महेश कोठारे