नव्याने सुरु झालेल्या निलेश साबळेंच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. निलेश साबळेंसह भाऊ कदम आणि ओंकार भोजने कार्यक्रमात आहेत. भाऊ कदम आणि ओंकार भोजने दोघांना स्त्री वेशात पाहून प्रेक्षक संतापले होते. आता कार्यक्रमाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये निलेश साबळे नाना पाटेकरांच्या भूमिकेत दिसत आहेत.
'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या नवीन प्रोमोमध्ये 'जुनं फर्निचर' सिनेमाची टीम आली आहे. महेश मांजरेकर, पत्नी मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, सचिन खेडेकर यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. निलेश साबळेंनी नाना पाटेकरांचा नटसम्राटमधील लूक केला आहे. तिघांच्या कॉमेडीवर सिनेमाची टीम खळखळून हसते. एकूणच कार्यक्रमात धमाल आलेली दिसत आहे.
कार्यक्रमाच्या नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडलाय. पण काही नेटकऱ्यांनी महेश मांजरेकरांना पाहून वेगळी मागणी केली. मांजरेकर आलेच आहेत तर बिग बॉस मराठीचा पुढचा सिझन कधी येणार हे सांगा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या प्रोमोपासूनच नेटकरी बिग बॉस परत आणा म्हणत कार्यक्रमावर टीका करत होते. आता महेश मांजरेकरांना पाहून पुन्हा बिग बॉसची चर्चा सुरु झाली आहे.