माही विजने आतापर्यंत लागी तुझसे लगन, तेरी मेरी लव्ह स्टोरी, बालिका वधू, लाल इश्क यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे लग्न अभिनेता जय भानुशालीसोबत झाले असून त्याने कयामत, किसे देस में है मेरा दिल, धुम मचाओ धूम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो अभिनयासोबतच त्याच्या सूत्रसंचालनासाठी देखील ओळखला जातो. त्याने आजवर डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाच्या अनेक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचसोबत झलक दिखला जा, नच बलिये यांसारख्या कार्यक्रमात आपल्याला त्याचा नृत्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. सध्या तो नच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनचे सूत्रसंचालन करत आहे.
माहीने 21 ऑगस्टच्या सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून जयनेच ही गुड न्यूज सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. जयने त्याच्या मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या मुलीच्या पायाची पप्पी घेताना दिसत आहे. जयने या पोस्टमध्ये त्याच्या मुलीचे नाव काय असणार याबाबत खुलासा केलेला नाहीये.
माहीने देखील तिच्या इन्स्टाग्रामद्वारे ही गुड न्यूज दिली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार... आम्ही देवाकडे इतकी वर्षं केलेली प्रार्थना देवाने पूर्ण केली. मला आई बनवण्यासाठी धन्यवाद. आमच्या आयुष्यात गोंडस मुलगी आली असून आमचे आयुष्य संपूर्णपणे बदलण्यासाठी खूप सारे धन्यवाद...
माही आणि जयचे फॅन्सना त्यांना त्यांच्या पोस्टवर कमेंट करत खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. जय आणि माही यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. छोट्या पडद्यावरील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. माही आणि जय यांचे हे पहिले मूल असले तरी त्यांनी दोन मुले दत्तक घेतली आहेत. ही दोन्ही मुले जय आणि माहीकडे काम करणाऱ्या बाईची असून ती त्यांच्या पालकांसोबतच राहातात. केवळ हे दोघे या मुलांचा संपूर्ण खर्च उचलतात.