टेलिव्हिजनचं स्टार कपल जय भानुशाली (Jay Bhanushali) व माही विज (Mahhi Vij) यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जय व माहीच्या घरी काम करणाऱ्या कुकनेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर माही व जय दोघांनाही त्यांची लेक ताराची काळजी वाटत आहे. या जोडप्यानं कुकविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित कुकूला अटक केली. मात्र काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर आता आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.
काय आहे प्रकरणगुरूवारी जय व माही दोघांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरी काम करणाऱ्या कुकने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. कुकने जय व माहीच्या 4 वर्षांच्या मुलीला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माहीने ट्विटर वर पोस्ट टाकत मुलीची काळजी वाटत असल्याचं म्हटलं होतं. कुकने मला चाकू भोसकून ठार मारण्याची धमकी दिल्याचंही तिने ट्विटमध्ये लिहिलं होतं. पण नंतर तिने सगळे ट्विट डिलीट केले.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत माहीने संपूर्ण घटना सांगितली. ती म्हणाली, ‘तो कामावर आला त्याला फक्त तीनच दिवस झाले होते आणि तो चोरी करत असल्याचं आम्हाला कळलं होतं. जय घरी आल्यावर मी त्याला ही गोष्ट सांगितली आणि जयने त्याला त्याचे तीन दिवसांचे पैसे देऊन घरातून निघून जायला सांगितलं. पण त्याने पूर्ण महिन्याचा पगार मागितला. जयने याचं कारण विचारल्यावर, त्याने आम्हाला धमकावणं सुरू केलं. 200 बिहारी आणून उभे करेल, असं म्हणत दारूच्या नशेत त्याने आम्हाला शिवीगाळ केली. आम्ही पोलिसांकडे गेलो. मला माझी भीती नाही. पण माझ्या मुलीसाठी मला भीती वाटतेय. तो जामीनावर सुटला आहे. पण त्याने चाकूनं भोसकलं तर काय होईल? त्याने मला मारलं तर काय होईल? लोक नंतर आवाज उठवतील, पण त्याचा काय फायदा? त्या माणसाने कामावरुन काढल्यानंतरही फोन करुन आम्हाला धमक्या देणं सुरू ठेवलं होतं. माझ्या जवळ त्याचे रेकॉर्डिं देखील आहेत, असं तिने सांगितलं.