माही वीज आणि तिचा नवरा जय भानुशाली काही दिवसांपूर्वी मुझसे शादी करोगे या कार्यक्रमात दिसले होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत पारस छाब्रा आणि शहनाज गिल यांनी देखील हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमात माही आणि जयने व्यक्त केलेली काही मतं लोकांना रुचली नव्हती आणि त्यामुळे त्या दोघांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या दरम्यान एका ट्रोलरने माहीला सोशल मीडियावर अतिशय असभ्य भाषेत ट्रोल केले होते. एवढेच नव्हे तर तिच्या आई आणि मुलीच्या नावाचा देखील वापर केला होता. माहीच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी देखील दिली होती. या सगळ्या गोष्टीमुळे माही प्रचंड भडकली होती.
माहीने या ट्रोलरला उत्तर देताना म्हटले होते की, माझ्या मुलीचे आणि आईचे नाव मध्ये आणू नकोस... आणि हिंमत असेल तर माझ्यासमोर ये. तुला लहानाचे मोठे करणाऱ्या कुटुंबियांना तुझ्या या गोष्टीची नक्कीच लाज वाटत असेल.
माहीने या ट्रोलरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे ठरवले होते. पण तिला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करता आला नाही. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, माहीने सोशल मीडियाद्वारे त्या ट्रोलरला सांगितले होते की, मी आता पोलिस स्टेशनला जात आहे. तुझ्यात हिंमत असेल तर तू देखील तिथेच ये... त्याप्रमाणे माही ओशिवारा पोलिस स्टेशनला गेली होती. तिने तिथे एक तास तरी त्या व्यक्तीची तिने वाट पाहिली. पण अपेक्षेप्रमाणे त्या व्यक्तीने तिथे न येणेच पसंत केले आणि आता हे ट्वीट देखील डीलिट करण्यात आले आहे. ट्वीट डीलिट केले असल्याने माही सायबर पोलिसांकडे याविरोधात तक्रार करू शकली नाही.