Join us

'तुला जपणार आहे'च्या एका सीनसाठी महिमा म्हात्रेला ११ ते १२ तास राहावे लागले पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:14 IST

Tula Japnar Aahe : 'तुला जपणार आहे' मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रोमो पाहून टेलिव्हिजनवर काही तरी वेगळे पहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe Serial) मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रोमो पाहून टेलिव्हिजनवर काही तरी वेगळे पहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि एक आई तिथे असूनही तिची मदत करू शकत नाही. पण तिकडे एक तरुणी येते आणि विचार न करता पाण्यात उडी मारते आणि लहान मुलीला वाचवते. हे दिसत तितकं सोपं नाही हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे. या प्रोमोमध्ये जिने त्या लहान मुलीचा जीव वाचवला म्हणजेच मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रेने प्रोमो शूटचा किस्सा ऐकवला. 

महिमा म्हात्रे म्हणाली की, "मालिकेचा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण प्रोमोमध्ये वेदा पाण्यात पडते हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला. जवळपास १३ - १४ फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवून त्यात चेहऱ्याचे हावभाव दाखवणं कठीण होत. जेव्हा आम्ही रिहर्सल केली त्यावेळी माझ्या अंगावर ६ किलो वजन बांधले होते. शूटच्या दिवशी मी जवळपास ११-१२ तास पाण्यात होते. हिवाळा असल्यामुळे प्रचंड थंडी होती." 

ती पुढे म्हणाली की, "जेव्हा शूट पूर्ण झाले तेव्हा मी एक चॅलेंज पूर्ण केले अस जाणवले. त्या दिवसानंतर मी आजारी पडले, पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शूटिंगसाठी गेले माझ्यात ते बळ कुठून आलं याची मला कल्पना नाही. आता जेव्हा हा प्रोमो पाहते तेव्हा खूप आनंद होतो आणि मेहनतीच चीज झाले याचा प्रत्यय येतो."