सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो ही मालिका प्रसारित होत असून यात सृष्टी जैन आणि नमिश तनेजा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेमध्ये अभिनेता नमिश तनेजा साकारत असलेल्या समर या आदर्श जावयाच्या हृदयस्पर्शी भूमिकेमुळे त्याला दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत आहे. आजकालचे टेलिव्हिजन कलाकार अष्टपैलू असतात ते केवळ अभिनयातच पारंगत असतात असे नाही तर त्यांच्यातील काही उत्कृष्ट गायक आहेत, काही कुशल कलाकार आहेत. त्यांच्यातील काही सोशल मीडियावर टिप्स आणि मेकअपचे धडे देतात. नमिश तनेजा असाच हरहुन्नरी कलाकार आहे. हा एक मुरलेला अभिनेता आहेच मात्र त्यासोबतच तो एक उत्कृष्ट नर्तक देखील आहे. मालिकेतील एका आगामी नृत्याच्या दृश्यात कलाकार आणि क्रूला मदत करण्यासाठी नमिश चक्क नृत्यदिग्दर्शक बनला. में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेच्या कलाकारांनी नुकतेच ‘तीज’चे दृश्य चित्रित केले आणि क्रिएटिव्ह टीमने घरातील बायकांसाठी एक पारंपरिक नृत्य करण्याचे योजले होते. त्यासाठी एका नृत्यदिग्दर्शकाला देखील बोलावण्यात आले होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे तो सेटवर पोहोचू शकला नाही. त्यामुळे पंचाईत होऊन बसली. शुटींगचा आणि कलाकारांचा वेळ वाया जात होता. त्यावेळी नमिश मदतीसाठी सरसावला. या गुणी कलाकाराने सर्व महिलांना नृत्याच्या काही पारंपरिक स्टेप दाखवल्या, ज्याच्यामुळे वेळ निभावून नेता आली. नमिश तनेजाला याबाबत विचारले असता त्याने सांगितले, “मला नृत्य करायला आवडते आणि भूतकाळात अनेक म्युझिक व्हिडिओचा मी भाग होतो. या दृश्यात सृष्टी म्हणजे जयाला इतर अभिनेत्रींसोबत एक पारंपरिक नृत्य करायचे होते. काही कारणामुळे ऐनवेळी नृत्यदिग्दर्शक येऊ शकला नाही. मी त्यांना काही सोप्या स्टेप्स दाखवल्या, ज्या अगदी थोड्याच वेळात त्यांना जमल्या. त्यामुळे आम्ही कोणत्याही विलंबाशिवाय चित्रीकरण पूर्ण करू शकलो. पडद्यावरील माझी समर ही व्यक्तिरेखा देखील नेहमी आसपासच्या लोकांना मदत करणारी आहे आणि प्रत्यक्षात देखील मी तसाच आहे.” ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता सोनीवर प्रक्षेपित केली जाते.
में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेतील नमिश तनेजा बनला नृत्यदिग्दर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 6:12 PM