Join us

बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता छोट्या पडद्यावर करणार पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 06:30 IST

या अभिनेत्याने बॉलिवूडसोबतच मराठी इंडस्ट्रीत त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा मकरंद देशपांडे सांभाळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या सोबत मकरंद देशपांडे या स्पर्धेत परीक्षकाची भूमिका निभावणार आहे.

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटकं लिहिणारा मकरंद देशपांडेने मराठी रंगभूमीवर देखील अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे. पण आता मकरंद टेलिव्हिजनवर पुनरागमन करून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर १० वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाने १० वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला होता. अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला हवा हवासा असलेला हा मंच पुन्हा एकदा येतोय ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची ही सुवर्ण संधी मिळेल. या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा मकरंद देशपांडे सांभाळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या सोबत मकरंद देशपांडे या स्पर्धेत परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. हा कार्यक्रम १५ जानेवारी पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 

या कार्यक्रमाबद्दल बोलताना मकरंद देशपांडे सांगतो, "या मंचाने याआधी देखील बरेच कलाकार या इंडस्ट्रीला दिले आहेत आणि आता हा मंच पुन्हा एकदा अनेकांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पर्धा कठीण आहे पण ती तितकीच रंजक पण असेल यात काहीच शंका नाही." 

टॅग्स :झी मराठी