‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Jhala) मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, मालिकेत इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) याच्या गाडीला नुकताच अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून अजिंक्य या अपघातातून थोडक्यात बचावला.अजिंक्यने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. अपघातानंतरचा गाडीचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये अजिंक्य म्हणतो, ‘नमस्कार मी अजिंक्य राऊत, आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मी दिवाळीला गावी जात होतो. पण जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही. या अपघातानंतर एक गोष्टी नक्की शिकलो ज्यावेळी एखादा जीवघेणा प्रसंग समोर येतो प्रसिद्धी, वलय किंवा इतर गोष्टी उपयोगाच्या नसतात. मी या अपघातातून वाचलो यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. स्वत:ची काळजी घ्या. कारण माझ्या लक्षात आलं आहे की, सर्व काही एका सेकंदात संपू शकतं. कोणताही चमत्कार होण्याची वाट पाहू नका. फक्त पुढे जा आणि तुमची स्वप्नं पूर्ण करा...कृतज्ञतेच्या भावनेने प्रत्येक क्षण जगा. कारण क्षणात सर्वकाही नष्ट होऊ शकतं. देवाच्या कृपेने माझे प्राण वाचले. मी ठाण्याहून परभणीला जाताना हा अपघात झाला. तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.’ व्हिडीओमध्ये अजिंक्यची गाडी शेतात पडल्याचं पहायला मिळत आहे. अपघात कसा झाला, हेही त्यानं सांगितली आहे. ‘ आमच्या गाडीचा वेग सर्वसाधारणच होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नशिबाने रस्त्याच्या बाजूला दरी नव्हती. 1100 व्होल्टच्या खांबाला आमची गाडी धडकणार होती. माझ्या मित्राने खांबाचा धक्का चुकवण्यासाठी गाडी फिरवली आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात घसरली. सुदैवाने आम्हाला गंभीर दुखापत झाली नाही,’असं त्याने म्हटलं.