छोट्या पडद्यावर 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावतेय. इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांच्या चांगलीच पसंतीस पात्र ठरत आहे.
सगळ्याच कलाकारांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेतील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे नयन कानविंदे. अभिनेता अमित परब ही व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळेच तो सध्या चर्चेत आला आहे.त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना नक्कीच रस असणार. अमित याने एम.बी.ए. केलं आहे आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहे. बाबांची सरकारी नोकरी आणि आई गृहिणी असल्यामुळे घरामध्ये अभिनयाची पार्श्वभूमी नाही. पण अमित हा जॉब करून 'मन उडू उडू झालं' या मालिकेमध्ये काम करतोय.
याबद्दल बोलताना अमित म्हणाला, "मी सध्या एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये कार्यरत आहे. केवळ आवड असल्यामुळे मी अभिनयाकडे वळलो. माझा निर्णय ऐकल्यावर आई बाबा थोडे टेन्शनमध्ये आले होते. कारण या क्षेत्रात आमच्या परिवारातील दूर दूर पर्यंत कोणी नाही. हळू-हळू मला काम मिळत गेलं आणि त्यांनी माझी आवड ओळखून मला सपोर्ट केला.
सुरुवातीला २ वर्ष प्रयत्न करून बघ आणि काहीच नाही झालं तर पुन्हा जॉब कर असा सल्ला आधी त्यांनी मला दिला होता. आवड, योगायोग आणि माझी मेहनत यामुळे २ वर्षाच्या आत मला ब्रेक मिळाल्यामुळे मी जरा रिलॅक्स झालोय. लॉकडाऊन लागल्यावर मला खूप वेळ मिळाला. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला माझ्या अभिनयाच्या प्रॅक्टिससाठी देखील वेळ देता आला. नयन या भूमिकेसाठी मी व्हिडीओ पाठवून ऑडिशन दिलं आणि ही भूमिका मला मिळाली. प्रेक्षकांना माझं काम आवडत असल्याचं मला समाधान आहे."