'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. सध्या मालिकेत आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. इंद्रा-दीपू नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत. कार्तिक आणि सानिका सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे मालिकेतील इंद्राने म्हणजेच अजिंक्य राऊतने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा-दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. त्यामुळेच इंद्राने या मालिकेदरम्यानचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, इंद्रा-दीपूच्या जोडीला प्रेम दिल्याबद्दल आभार. एक चांगला दिग्दर्शक, सपोर्ट करणारे चॅनेल, चांगल्या संकल्पना आणि भूमिका, टॅलेंटेड सहकलाकार हे माझ्यासाठी 'मन उडू उडू झालं' आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेचे शूटिंग संपले असून शूटिंग संपल्यानंतर मालिकेतील कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केले होते. त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
'मन उडू उडू झालं' या मालिकेचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.