छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत तिने दीपूची भूमिका साकारली आहे आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली आहे. हृता मालिकेशिवाय बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सध्या तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र आता याबाबतचा खुलासा अभिनेत्रीनं लोकमतकडे केला आहे.
सोशल मीडियावर हृता दुर्गुळे आणि तिचा प्रियकर प्रतीक शाह पुढील महिन्यात म्हणजेच मे, २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबतचा खुलासा हृताने केला आहे. याबाबत ती म्हणाली की, या चर्चेत अजिबात तथ्य नाही. अजून आमचं लग्नाबाबत काहीही ठरलेले नाही. १० जून रोजी माझा चित्रपट अनन्या रिलीज होतो आहे. त्यामुळे इतक्यात आमचं लग्नाबाबत काहीही ठरलेले नाही. आमच्या लग्नाच्या डेटबद्दल जी माहिती समोर येत आहे, ती चुकीची आहे.