Join us

तब्बल 13 वर्षांनी मराठीत दमदार कमबॅक करण्यास सज्ज झाली 'ही' अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:11 PM

'असंभव' या मालिकेत तिने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. '

झी मराठी वाहिनीवर ३१ डिसेंबर पासून 'काय घडलं त्या रात्री?' हि नवीन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १३ वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी साळवी हिची मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री होतेय. मानसीने याआधी सौदामिनी आणि नुपूर या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'असंभव' या मालिकेत मानसीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत मानसी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्येमागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक केली जाते. ही हुशार व चलाख पोलिस ऑफिसर तिच्या पद्धतीने प्रत्येकासमोर निडरपणे उभी राहते, पत्रकारिता असो वा राजकारण कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते.

तिच्या या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मानसी म्हणाली, "प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं कि त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

ती  एक तत्वनिष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. १३ वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे आणि ते माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे." 

टॅग्स :झी मराठी