Join us  

'मालिकांपेक्षा न्यूज चॅनल्सचा टीआरपी जास्त कारण...' मनवा नाईकने राजकारणावर मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 5:30 PM

मतदान केल्यानंतर मनवा नाईकने राजकारणावर परखड शब्दात प्रतिक्रिया दिली.

आज मुंबईतमतदानाचा दिवस आहे. देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी सर्वच मतदानाचा हक्क बजावत आहे. सध्याचं राजकारण पाहता लोक संतापलेले तर आहेतच. कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. पण तरी नागरिक आवर्जुन मतदानाचा हक्क बजावत आहेत. अभिनेत्री, निर्माती मनवा नाईकनेही मतदान केले. यानंतर 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत ती काय म्हणाली वाचा. 

मतदान केल्यानंतर अभिनेत्री मनवा नाईकने (Manava Naik) 'लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "पक्ष फुटल्यामुळे एकंदरीत भीती वाटतेय. कारण प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारधारा होती. सगळे नागरिक ती जाणत होते. आता पक्षांची विचारधारा कितपत फॉलो करायची असा माझ्या मनात प्रश्न आहे."

सिनेसृष्टीत राजकारणावर चर्चा होते का यावर मनवा म्हणाली, "हो सिनेसृष्टीत खूप चर्चा होते. मला वाटतं राजकारणावर चर्चा होणं आता खूप सामान्य झालं आहे.नाक्यावर जरी गेलात तरी तिथे चहा पिणारे लोक राजकारणावर बोलत असतात. आपल्या मोबाईलमध्येही वृत्तवाहिन्यांचे अॅप जास्त असतात. आम्ही तर टीव्ही इंडस्ट्रीतले लोक असं म्हणतो की न्यूज चॅनल्स मालिकांपेक्षा जास्त टीआरपी घेतात. कारण इथे ड्रामा जास्त आहे. त्यामुळे चर्चा होते, लोक बघत आहेत. सामान्य ते सर्वात श्रीमंत माणसापर्यंत सर्वच राजकारण फॉलो करतात कारण प्रत्येक पॉलिसी, प्रत्येक नियम, प्रत्येक निर्णय हे आपल्यावर, आपल्या इंडस्ट्रीवर परिणाम करतं हे आपल्याला माहित आहे. आपण डोळे बंद करुन हा माझी एक नोकरी चालू आहे असा कोणी विचार करत नाही."

टॅग्स :मराठी अभिनेतामतदानराजकारणमुंबई