सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गुन्हेगारी सत्य कथांवर आधारित शो 'क्राइम पेट्रोल २.०' (Crime Petrol 2.0) जेव्हापासून सुरू झाला आहे, तेव्हापासून त्याला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम आणि कौतुक मिळत आहे. रहस्य, थरार आणि भयानक कट-कारस्थानांच्या या कथा प्रेक्षकांना भयाचा अनुभव देतात. क्राइम पेट्रोल २.० मध्ये पोलीस अधिकार्यांच्या भूमिकेत आता नवे कलाकार दिसत आहेत. या संचात आता दाखल होत आहे, प्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई(Mangesh Desai), जो या शो मध्ये सुनील केळकर नामक पोलीस अधिकार्याची भूमिका करणार आहे.
आपली व्यक्तिरेखा आणि तिच्याबद्दल आपण माहिती कशी मिळवली, हे सांगताना मंगेश म्हणतो, “सुनील केळकर एक तपास अधिकारी आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकारची प्रकरणे हाताळली आहेत. पोलीस खात्यातील तो एक महत्त्वाचा अधिकारी होता. त्याचे व्यक्तिमत्व काहीसे हळवे आहे, देशाविषयी त्याच्या मनात अपार प्रेम आहे. आपल्या कुटुंबाच्याही आधी तो देशाला प्राथमिकता देतो. एखादे प्रकरण सोडवताना तो त्यावर बरेच चिंतन करतो, आडाखे बांधतो आणि त्यामुळे तो गुन्ह्याच्या रहस्याच्या मुळाशी जाऊन पोहोचतो. पोलीसची ही भूमिका करताना ती जास्तत जास्त नैसर्गिक वाटावी यासाठी मी प्रयत्न केला आहे.”
या व्यक्तिरेखेस जिवंत करण्यासाठी त्याने काय अभ्यास केला आणि तयारी केली याबद्दल तो म्हणतो, “आपल्याकडून दररोज अनाहूतपणे घडत असलेल्या दुर्घटनांमधून मी खूप काही शिकलो आहे. उदा. लोक त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मालमत्तेचा पासकोड सहज कुणालाही देऊन टाकतात ज्याचे नुकसान त्यांना भविष्यात सोसावे लागते. अशा अगदी लहान-सहान गोष्टींमधून मी अभ्यास करण्यास सुरुवात केली, ज्याच्यामुळे माझ्या कामातले बारकावे मला समजले. क्राइम पेट्रोल शृंखलेचा मी चाहता आहे. हा शो मी असंख्य वेळा बघितला आहे. अशा गाजलेल्या शोचा भाग मी होत आहे, हे मी माझे सद्भाग्य मानतो. क्राइम पेट्रोल २.०च्या नव्या प्रवासाची मी आतुरतेने वाट बघत आहे.