गणपतीच्या अतिशय सुरेख आणि सुबक पर्यावरणप्रेमी मूर्ती बनविणाऱ्या ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या अंध विद्यार्थ्यांनी ‘नच बलिये’च्या मंचावर उपस्थिती लावली होती. यावेळी या मुलांनी स्पर्धक आणि परीक्षकांशी संवाद साधला. या मुलांची चर्चा केल्यावर सर्व परीक्षकही सुखावले.
आपण गणपतीची मूर्ती कशी बनवितो आणि रंगवितो, याची माहिती यावेळी ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सदस्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना दिली. मात्र हे विद्यार्थी वेगवेगळे रंग पाहू शकत नसल्याने प्रत्येक रंग ओळखण्यासाठी आपल्याला प्रत्येक रंगात एक विशिष्ट सुवास टाकावा लागतो, अशी माहिती एका सदस्याने देताच परीक्षक रवीना टंडन आणि काही जणांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
या अंध सदस्यांशी गप्पा झाल्यावर मंचावर किंवा सेटवर अशी एकही व्यक्ती नव्हती, जिचे डोळे ओले झाले नाहीत. दृष्टीसारखा जीवनाचा महत्त्वाचा पैलूच नसतानाही त्यावर मात करणाऱ्या या सदस्यांना पाहून सर्वच जण भावनावश झाले होते. यावेळी आणखी एक घटना घडली. या सदस्यांची स्थिती पाहून अनेक स्टारनी त्यांना आपापल्या परीने मदत करण्यासाठी तात्काळ पावले उचलली.