लॉकडाऊनमुळे कमाईचे सर्व मार्ग बंद झाले़ डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आणि निराश होत टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. मुंबईच्या खारघर येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केली. दु:खद म्हणजे, मनमीतच्या आत्महत्येनंतर कुणीही त्याच्या पत्नीच्या मदतीला आले नाही. मनमीतची पत्नी मदतीची याचना करत राहिली. पण कोरोनाच्या भीतीने कुणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही.
मनमीतच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. मित्रांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. आता मनमीतचा अगदी जवळचा मित्र मनजीत सिंग याने त्या दिवशी मनमीतसोबत नेमके काय घडले हे सांगितलेय. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मनजीत सिंगने सांगितले, ‘मनमीतने आत्महत्या केली, त्यादिवशी संध्याकाळपर्यंत सगळे काही सामान्य होते. रात्र झाली, तशी मनमीतची पत्नी किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागली आणि ती किचनमध्ये बिझी होताच मनमीत त्याच्या खोलीत गेला. याचदरम्यान खुर्ची पडल्याचा आवाज झाला. त्या आवाजाने मनमीतची पत्नी खोलीकडे धावली. मनमीतने पत्नीच्या ओढणीनेच स्वत:ला फासावर लटकवले होते. पत्नीने ते पाहून फासावर लटकलेल्या पतीचे पाय धरले आणि मदतीसाठी ती जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजारी आले. पण कोरोनाच्या भीतीमुळे मदतीसाठी कुणीही समोर आले नाही. ओढणी फाडा, याला खाली काढा, असे पत्नी ओरडत होती. मात्र कुणीही मनमीतला स्पर्श करण्यास तयार झाले नाही. मनमीतला कोरोना नाही, असेही पत्नी ओरडत होती, पण सगळे जण तिची मदत करण्याऐवजी व्हिडीओ बनवण्यात गुंग होते. पत्नी मदतीसाठी ओरडत असताना मनमीतचा चा श्वास सुरु होता की नाही, हे माहित नाही. पण माझ्यामते, त्याला त्याक्षणी मदत मिळाली असती तर कदाचित तो आज जिवंत असता,’ असेही हा मित्र म्हणाला.
कर्जामुळे केली आत्महत्यालॉकडाऊनमुळे मनमीतचे काम बंद होते. अशात त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला होता. अनेक महिन्यांचे घराचे भाडेही थकले होते. यामुळे मनमीत डिप्रेशनमध्ये होता. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. मनमीत आदत से मजबूर या शोशिवाय आणची काही मालिका व जाहिरातींमध्ये काम केले होते. एका वेबसीरिजमध्ये काम मिळाले असतानाच लॉकडाऊनमुळे या वेबसीरिजचे शूटींगही ठप्प पडले होते. यामुळे मनमीत गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडला होता.