आपल्या अभिनयानं मनोज वाजपेयीनं बॉलिवुडमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या सिनेमातून मनोजच्या अभिनयाच्या विविध छटा रसिकांनी अनुभवल्या आहेत. 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये टोळीचा म्होरक्या सरदार खानच्या भूमिका असो किंवा मग 'चक्रव्यूह'मधली नक्षलवाद्याची भूमिकेतून त्यांनी आपली विशेष छाप पाडली.आता लवकरच मनोज वाजपेयी छोट्या पडद्यावर वेगळ्याच अंदाजात रसिकांच्या भेटीला येणार आहे. मनोज वाजपेयी गुन्हेगारांचा पर्दाफाश करताना दिसणार आहे.
18 जुलैपासून ‘इंडिया टीव्ही’वर ‘सावधान इंडिया'या शोचा नवीन सिझन सुरू होणार आहे.या शोच्या विशेष भागात मनोज वाजपेयी सुत्रसंचालन करणार आहेत.हा खास एपिसोड येत्या स्वातंत्रदिनी प्रसारित होणार आहे. या मालिकेत आता नव्या काळातील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून कट्टर गुन्हेगार आपल्या कार्यशैलीत कसे बदल करत असून ते लोकांची फसवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात ते यात दाखवले जाणार आहे.चेह-यावर स्मितहास्य ठेवणारा टॅक्सीचालक,तुमच्याबद्दल जरा जास्तच काळजी दाखवणारा कॉल सेंटरचा कर्मचारी किंवा अतिउत्साही डिलिव्हरी बॉय हे भावी गुन्हेगार असू शकतात. त्यांना तुमच्या जीवनात प्रवेश देण्यापूर्वी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. याआधीच्या सिझनमध्येही गुन्हे आणि गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी सावधान इंडियाने खास जनजागृतीही केल्याचे आपण पाहिले आहे.तसचे पूर्वीप्रमाणेच सुशांत सिंग हा याशोचे सुत्रसंचालन करणार आहे.
‘वक्त के साथ अपराधी हुआ अपग्रेड,आप भी हो जाईयें अप टू डेट’ अशी टॅगलाईन असलेल्या या शोमधून मधून आपल्याला जर आपण सतर्क नसलो तर आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक धोक्यांची जाणीव करून दिली जाणार आहे.काहीवेळा अतिशय साधारण गोष्टीसुद्धा केवळ आपण सतर्क न राहिल्यामुळे कशाप्रकारे धोकादायक बनू शकतात हे यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.