मानसी साहारिया ठरली द व्हाईस इंडिया किड्सची विजेती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 7:18 AM
द व्हाईस इंडिया किड्स या &TV वरील कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांनी या कार्यक्रमाच्या फायनलला एकाहून एक परफॉर्मन्स सादर केले. या ...
द व्हाईस इंडिया किड्स या &TV वरील कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांनी या कार्यक्रमाच्या फायनलला एकाहून एक परफॉर्मन्स सादर केले. या स्पर्धकांमधून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. कानपूरचे शेकिना मुखिया आणि गुंटास कौर, जयपूरचा मोहम्मद फाजिल, गुवाहाटीची श्रुती गोस्वामी, उदमारीची मानसी साहारिया आणि अलिपूरदौरची निलांजना रे या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम सामना रंगला. त्यातून मानसी द व्हाईस इंडिया किड्सची विजेता ठरली. तिला २५ लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर श्रृती आणि निलांजना यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. त्या दोघींना १० लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. द व्हाईस इंडिया किड्सच्या फायनलच्या भागात टॉपच्या सहा स्पर्धकांनी त्यांच्या लाडक्या कोचसोबत गाणी गाणार केली. तसेच या शोमधील आजवरच्या प्रवासाविषयी गप्पा मारल्या. या कार्यक्रमाची विजेतेपद मिळाल्याबद्दल मानसी प्रचंड खूश झाली होती. मानसी सांगते, मी माझ्या गावातील लोकांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते. त्यांनी माझ्यातील टायलेंट ओळखून मला इथपर्यंत येण्यास साथ दिली. त्यांच्यामुळेच मी आजवर पाहिलेली स्वप्न खरी करू शकले. माझ्या कोच पलक यांनी मला मला खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला. तसेच मला विजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. द व्हाईस इंडिया किड्स या कार्यक्रमामुळे माझ्या मनात आता विश्वास निर्माण झाला आहे की, तुमच्यात टायलेंट असल्यास तुम्ही यश मिळवू शकता. मला या कार्यक्रमामुळे अनेक चांगले मित्रमैत्रीण, गुरू भेटले. त्यांच्या सगळ्याची मी आभारी आहे. मानसी ही आसाम मधील एका छोट्याशा गावात राहाणारी आहे. तिच्या आईला गायनाची आवड असल्याने आई गात असताना मानसी देखील तिच्यासोबत गायला लागली. मानसी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गात आहे. तिच्या गावाची लोकसंख्या ही केवळ तीनशेच्या आसपास आहे. गावात तिला कोणीही संगीत शिक्षक मिळत नसल्याने ती गाण्याचे व्हिडिओ ऐकून गायनाचे धडे गिरवत असे. मानसीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने द व्हाईस इंडिया किड्स या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत कसे यायचे हा त्याला प्रश्न पडला होता. पण मुंबईत येण्यासाठी तिच्या गावातील लोकांनी पैसे जमवले. त्यामुळेच तिने विजेतेपद मिळाल्यावर तिच्या गावकऱ्यांचे पहिले आभार मानले. Also Read : सिंगर पपॉन अडचणीत! रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने केले किस!