तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची टीम आता एखाद्या कुटुंबाप्रमाणे झाली आहे. सगळेच कलाकार एकमेकांसोबत सेट वर मजा मस्ती करतात. डॉ. हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद हे सेटवर सगळ्यांचे लाडके होते. स्पॉट बॉय पासून सगळ्यांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते.
कवी कुमार आझाद मुंबईत त्यांच्या भावासोबत राहत होते. ते अविवाहित होते. त्यांच्या वजनामुळे ते अनेकवेळा आजारी असत. त्यांनी वजनासाठी शस्रक्रिया देखील केल्या होत्या. अनेकवेळा त्यांची तब्येत खूप ठासळली होती. त्यांची तब्येत सतत खराब होत असल्याने आपल्या आयुष्यचे काही खरे नाही असे अनेकवेळा ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सांगत असत.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांची आज तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत असा त्यांनी सकाळी निरोप कळवला होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज एक मीटिंग मालिकेच्या सेट वर आयोजित करण्यात आली होती. पण त्या आधीच हि दुःखद बातमी मालिकेच्या सेट वर आली. त्यांच्या निधनाने मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे. ते सांगतात, कवी कुमार आझाद एक चांगले कलाकार आणि व्यक्ती होते. त्यांना बरे नसेल तरी ते चित्रीकरणाला यायचे. आज सकाळी ते येणार नसल्याचा निरोप त्यांनी दिला होता. पण आता जी बातमी आली त्याने आम्हाला सगळयांनाच मानसिक धक्का बसला आहे.