जगात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात भारतातही कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक असलं तरी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आयुष्याला नवी उभारी देतात. अभिनेता आशुतोष गोखले सध्याच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोनाच्या संकटामुळे शूटिंग थांबलं असलं तरी आशुतोषने हाती घेतलंल काम अविरत सुरु आहे.
खान चाहिए डॉट कॉम या संस्थेसोबत तो जोडला गेलाय. ही संस्था मुंबईतील बेघर आणि या कठीण काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना जेवण पोहोचवण्याचे काम करते. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतोय. ही संस्था दररोज ७५ हजारांहून अधिक फूड पॅकेट्सचे वाटप करते.
आशुषोत दररोज वांद्रे ते दहिसर लिंक रोड, ओशिवरा, जुहू, गोरेगाव अश्या भागातील गरजूंना अन्न पोहोचवतो. अर्थात सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करत आणि आवश्यक ती काळजी घेत आशुतोष हे काम नित्यनेमाने करतो.