Join us

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:22 AM

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला...

प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो पोस्टच्या माध्यमातून त्याचं मत अगदी परखडपणे व्यक्त करताना दिसतो. अभिजीतने आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्याने भारतीय जनता पार्टी(भाजपा)मध्ये प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या उपस्थिती अभिजीतने भाजपात प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिजीतने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 

अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रिया बेर्डे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबरचा भाजपा प्रवेशादरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने "भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश...किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया," असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला राजकीय कारकीर्दीतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिजीतच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिजीतने मागे एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करणारी पोस्टही शेअर केली होती. याआधी अनेक कलाकारांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. प्रिया बेर्डे, सुशांत शेलार यांसारखे कलाकार राजकारणात सक्रिय आहेत. 

दरम्यान, अभिजीतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या तो 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिजीत 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी तो एक होता. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटभाजपाटिव्ही कलाकारचंद्रशेखर बावनकुळे