दार उघड बये दार उघड असं म्हणत वहिनींचा पैठणी देऊन त्यांची सुखदुख जाणून घेणाऱ्या आदेश भावोजींचा १७ वर्षांचा प्रवास अजूनही सुरुच आहे. आता तर आदेश भावोजी वहिनींसाठी महामिनिस्टर घेवून आलेत. यावेळी विजेत्या वहिनींना 11 लाखांची पैठणी साडी असून ही पैठणी हिरेजडीत असून तिला सोन्याची झरी आहेत. मात्र हा शो सुरु होताच याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय... या नव्या शोबाबत नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली... आणि सोशल मीडियावर या शोला जोरदार ट्रोल केलं. इतक्या मोठ्या रक्कमेची पैठणी देण्यापेक्षा त्या कुटुंबाला आर्थिक स्वरुपात मदत करावी, अशी टीका या शोवर होताना दिसतेय... नुकतच आदेश बांदेकर यांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिलय.
काय म्हणाले आदेश बांदेकर "जे ११ लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहिती नाही आहे कि ती मी देणार नाही आहे. ती पैठणी प्रयोजकांकडून येते, झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो. तसंच १८ वर्ष सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज १ पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत नाही त्यामुळे हे ट्रोलिंग होतं. ११ लाखांची पैठणी हि येवलेमध्ये बनतेय आणि हि पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत ११ लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे."
काय म्हणाले होते ट्रोलर्स ?‘11 लाखांची पैठणी नेसून कोणाला मिरवायचं आहे, त्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे ते पैसे वापरा. लोकांना सध्या पैशांची गरज आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणीसुद्धा नाही. उन्हाळ्यामुळे लोकांचे हाल होतायत. तुम्ही त्यांची मदत करा’, अशा शब्दांत एका युजरने सुनावलं आहे. अन्य एका युजरनेही काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘11 लाखांच्या एका पैठणीऐवजी 11 लाख गरीब महिलांना साध्या साड्या वाटा,’असं या युजरने म्हटलं आहे. एका युजरने जरा चिमटा काढत, ‘ बापरे.. 11 लाखांची पैठणी कोणी चोरली तर? किंवा एखाद्याने रस्त्यावर चालताना हल्ला केला तर...?,’असा प्रश्न केला आहे. काहींनी बांदेकरांना 11 लाखांच्या पैठणीऐवजी 11 लाख रुपये रोख रक्कम देण्याचाही पर्याय सुचवला होता.