Join us  

अबब! ड्रायव्हर विनाच चालतेय कार, मराठी अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 6:02 PM

अजिंक्यने गाडीतून हा व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्य ज्या गाडीतून प्रवास करत आहे ती गाडी ड्रायव्हर विनाच चालत आहे.

अजिंक्य ननावरे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिकांमध्ये काम करुन त्याने कलाविश्वात त्याची ओळख निर्माण केली आहे. अजिंक्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. अजिंक्यने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

अजिंक्यने गाडीतून हा व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्य ज्या गाडीतून प्रवास करत आहे ती गाडी ड्रायव्हर विनाच चालत आहे. ड्रायव्हर सीटवर कोणीच बसलेलं नाही तरीदेखील गाडीचं स्टेअरिंग फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याबरोबरच ड्रायव्हर नसूनही गाडी व्यवस्थित रस्त्यावरुन मार्ग काढत पुढे जात असल्याचंही दिसत आहे. अजिंक्यने हा व्हिडिओ शेअर करत त्यामागचं गुपित सांगितलं आहे. खरं तर अजिंक्य टेस्लाच्या ऑटिमॅटिक कारमधून प्रवास करत आहे. ही एक सेल्फ ड्रिव्हन कार असून ड्रायव्हर विनाच ही कार चालते. 

"हॅलो, माझं नाव अजिंक्य ननावरे. मी सध्या किया कंपनीच्या सेल्फ ड्रिव्हन कारमधून प्रवास करत आहे. टेस्ला मोटर्सच्या सेल्फ ड्रिव्हन कार मार्केटमध्ये आल्या आहेत, हे तुम्हाला माहितच असेल. कियाने टेस्ला मोटर्सच्या या गाड्या लॉन्च केल्या आहेत. तुमचा यावर विश्वास बसतोय का? तुम्ही पाहू शकता ही गाडी स्वत:च चालत आहे. तेदेखील भारताच्या रस्त्यावर आणि मुंबईच्या ट्राफिकमध्ये...थँक्यू किया या अमेझिंग फिचरसाठी", असं अजिंक्य व्हिडिओत म्हणत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, अजिंक्यने 'तू जीवाला गुंतवावे', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.  सध्या तो 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्याने 'पावनखिंड' या सिनेमातही काम केलं आहे.  

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेस्लाकार