आपल्या अभिनयाने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदेला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती होती. 'वेलकम टू द जंगल' सिनेमाच्या शूटिंगनंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंता जाणवत होती. त्यानंतर कलाकारांचं लाइफस्टाइल आणि त्यांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. याबाबत आता मराठी अभिनेत्याने वक्तव्य केलं आहे.
श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर टीव्ही अभिनेत्याने मनोरंजन विश्वातील कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं आहे. मन उडू उडू झालं फेम अजिंक्य राऊतने नुकतीच रेडिओ सिटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "श्रेयस दादासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया. मी त्यांना खूप मानतो. ते आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहेत. आपण मनोरंजन क्षेत्रात आहोत त्यामुळे आपलं पण मनोरंजन होतंच असं नाही. जसे परदेशात कामाचे तास ठरवून दिले आहेत, त्याचे नियम आहेत, तसेच आपल्याकडे पण हवेत. १२ तासाचे १४ तास होतात...एक्स्ट्रा कामाचे पैसे मिळतात. पण, आपल्याकडे कलाकार आणि टेक्निकल टीममध्ये पण बेभानपणा जाणवतो. अभिनय हे उत्कटतेने करण्याचंच काम आहे. पण, तिथे कुठेतरी बांध असावा असं मला वाटतं. कारण शेवटी आपणही माणूसच आहोत."
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याची पत्नी दीप्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती. "श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. काही दिवसांमध्ये त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या गोष्टी खासगी ठेवण्यात सहकार्य कराल. तुमचं प्रेम आणि पाठिंबा हिच आमच्या दोघांची ताकद आहे.", असं दीप्तीने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
नेमकं काय घडलं?
श्रेयस तळपदे त्याच्या आगामी 'वेलमक टू जंगल' सिनेमाचं शूटिंग करत होता. त्याने गुरुवारी सिनेमातील काही अॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं.