Join us

"आता हे अती झालं...",  जोगेश्वरी अत्याचार प्रकरणी मराठी अभिनेत्याची संतापजनक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:30 IST

मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे, असं म्हटलं जातं.

Akshay Kelkar: मुंबई हे सर्वात सुरक्षित  शहर आहे, असं म्हटलं जातं. परंतु, मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेल्या महिला अत्याचार घटना सातत्याने समोर येत आहेत. अलिकडेच पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यामुळे आता महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मुंबईत घडलेल्या या घृणास्पद घटनेवर राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी  संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता व लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरने (Akshay Kelkar) यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

अक्षय केळकरने या प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामर स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, "आता हे सगळं अती झालं आहे. कायद्याचा धाक राहिला नाही कोणालाच... मेट्रो सिटीमध्ये अशी परिस्थिती आहे तर बाहेर अशा बऱ्याच गोष्टी असतील. #भीषण.." अशी संतापजनक पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. 

दरम्यान, अक्षय केळकर हा 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वामुळे चांगलाच चर्चेत आला होता. याशिवाय 'अबीर गुलाल' या मालिकेत सुद्धा तो झळकला आहे. या मालिकेत त्याने साकारलेली भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली. लवकरच हा अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनमुंबईजोगेश्वरी पूर्वसेलिब्रिटीसोशल मीडियागुन्हेगारी