Join us  

उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन, अभिनेता भावुक होत म्हणाला- "तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे कळल्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:02 AM

आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंद शिंदे यांच्या धाकट्या भावाचं निधन झालं आहे. काकाच्या निधनाने भावुक झालेल्या उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

शिंदे कुटुंब हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय घराणं आहे. आनंद शिंदे यांनी त्यांच्या लोकगीताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आदर्श आणि उत्कर्ष यांनीही त्यांचा शिंदेशाही बाणा जपला. आदर्श आणि उत्कर्ष दोघेही उत्तम गायक आहेत. आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे घराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आहे. आनंद शिंदे यांच्या धाकट्या भावाचं निधन झालं आहे. काकाच्या निधनाने भावुक झालेल्या उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

उत्कर्ष आणि आनंद शिंदेचे काका दिनकर शिंदे यांचं निधन झालं आहे. उत्कर्षने सोशल मीडियाद्वारे ही दु:खद बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. काकाच्या आठवणीत त्याने भावुक पोस्ट लिहिली आहे. 

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

(गायक-दिनकर प्रल्हाद शिंदे)महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव,आनंद मिलिंद शिंदेंचे धाकटे भाऊ आणि विजयाआनंद शिंदेचे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे.

हर्षद, उत्कर्ष, आदर्शचे दिनू नाना.काका कमी पण दोस्त जास्त. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदराचं आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार.

मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून ह्या सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकले. कसे हे सर्व मंगळवेढे गावात एकाच वाडीत समोर रहायचे...एकाच शाळेत शिकायचे.लहान पण कसं एकत्र गेलं.कसं लहानपणीच मम्मी-पप्पाच लग्न झालं. गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला.गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली.कसा शिंदेघराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला.

मोठा भाऊ म्हणजे बापच आणि वहिनी म्हणजे आई. हे तुमच्या कडून शिकलो दिनू नाना. भावाभावाने आजन्म एकत्रित कसं रहायचं ते तुमच्याकडून शिकलो.आज जेव्हा मी माझ्या पुतण्यांना आल्हाद हर्षद शिंदे,अंतरा आदर्श शिंदे, आलाप हर्षद शिंदे ह्यांना खाद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हालाही तुम्ही असेच खांद्यावर घेऊन वाढवलंत. तुम्ही ही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आपले मुलच. म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो. 

शिंदेघराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच.तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा,हास्य आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला...भावाभावातलं प्रेम...स्टेजवर तुम्ही एन्ट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू. 

तुम्हा सर्वांनाच्या संस्कारामुळेच आज हर्षद आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदेघराण्याचा वट्टवृक्ष आणखीन जास्त भव्य समृद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना we will miss u...

उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत या दु:खातून शिंदे कुटुंबीयांना सावरण्यासाठी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता