Join us

Astad Kale "नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:48 AM

Astad Kale "प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे घेऊन जाण्याची...", आस्ताद काळेचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर

आस्ताद काळे Astad Kale हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून आस्तादने सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आस्ताद अभिनयाबरोबरच त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. अलिकडेच चिन्मय मांडलेकरला मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे ट्रोल केलं गेल होतं. अनेक सेलिब्रिटींनी याबाबत भाष्य करत संताप व्यक्त केला होता. आता आस्तादने यावर भाष्य करत ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिलं आहे. तसंच आस्ताद हे नावंही पारसी भाषेतील असल्याचा खुलासा त्याने केला आहे. 

आस्तादने नुकतीच आरपार ऑनलाईन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या नावाबद्दल आणि नावावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, "नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान वगैरे होऊन गेलेला नाही. त्यामुळे माझे आईवडील वाचले. मला वाटतं हा खरं तर खूप वैयक्तिक प्रश्न आहे. बरं गजानन नाव ठेवलेला माणूस गुन्हेगार नाही होऊ शकत का? आहेत ना...मनोज नावाचे, राजन नावाचे क्रिमिनल होऊन गेलेले आहेत. नावात काही नसतं. घरी संस्कार काय करताय, त्यावर सगळं अवलंबून असतं. पण, प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे घेऊन जाण्याची एक मनोवृत्ती आहे. मी त्याला विरोधही करणार नाही आणि पाठिंबा तर मुळीच देणार नाही. चिन्मय आणि नेहा खूप मॅच्युअर आहेत". 

"मला या सगळ्याला सामोरं जावं लागलं नाही. कारण, तेव्हा इतक्या धार्मिक भावना बोथट नव्हत्या. एक तर हे नाव पारसी किंवा पर्शियन आहे, हेच लोकांना माहीत नाहीये. आणि पुन्हा तेच म्हणेन की या नावाचा कोणी सुलतान किंवा जुलमी आक्रमणकरता होऊन गेलेला नाही...आत्तापर्यंत तरी इतिहास असं आलेलं नाही. पुढे जाऊन असं काही आलं तर माझंही ट्रोलिंग होईल. पूर्वी या गोष्टी थेट पोहोचत नव्हत्या. पण आता याचं प्रमाण वाढलं आहे. मानवी समाजात पब्लिक फिगर कायमच सॉफ्ट टार्गेट असतात. कारण, त्यांच्याकडे कायम लोकांचं लक्ष असतं. ट्रोलर्सला चेहरा नसतो. आता तर फेक अकाऊंटवरुनही ट्रोलिंग होतं. खऱ्या अकाऊंटवरुन ट्रोलिंग करायला धजावत नाहीत, इतके काही जण पळपुटे असतात. त्यामुळे ट्रोलिंगला किती लावून घ्यायचं, हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे," असंही आस्ताद म्हणाला. 

ट्रोलिंग होण्याबाबत आस्ताद म्हणाला, "मी कोणतंही मत मांडलं की लोकांना वाटतं याचं कोणतं तरी प्रोजेक्ट येणार आहे. म्हणून याने पोस्ट केली आहे. जातीवरुन लोक लगेच बोलायला येतात. कुठलाही मु्द्दा धार्मिक, राजकीय आणि जातीय मुद्द्यांकडे वळवणं हा ट्रोलर्सचा छंद आहे. माझी राजकीय मतं सभ्य भाषेत मांडण्याचा मला अधिकार आहे. एका फेसबुक पोस्टमध्ये मी शिवी वापरली होती. तेव्हा काही लोकांनी मला हे सांगितलं होतं की तुझा मुद्दा बरोबर आहे. पण, शिवी वापरणं बरोबर नाही.  तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. मला ते पटलं. पण, याव्यतिरिक्त मी असभ्य भाषेत कधीच लिहिलेलं नाही. तरीसुद्धा लोकांना त्यात काहीतरी काढायचंच असेल तर मग त्यांच्या नसलेल्या बुद्धीमत्तेची मला कीव येते". 

टॅग्स :अस्ताद काळेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता