मराठी अभिनेता अतुल तोडणकरला आपण विविध मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. अतुलने 'फू बाई फू' सारखा रिअॅलिटी शोसुद्धा गाजवलाय. अतुल तोडणकर सोशल मीडियावर कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतो. अतुलने नुकतंच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात भेट देऊन तिथे आलेला दर्शनाचा अनुभव त्याने सांगितलाय.
अतुल तोडणकरने सोशल मीडियावर पत्नीसोबत दर्शन घेण्याचे फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करुन अतुल लिहितो, "स्वामींची भेट : अक्कलकोट, स्वामींचा आदेश + स्वामींच्या भेटीचा योग आणि त्वरित मी आणि माझी बायको पोहचलो अक्कलकोटला... आमच्या सोलापूरचे नाट्य व्यवस्थापक श्री. प्रशांत बडवे यांनी छान नियोजन केलं होतं त्यामुळे सकाळी स्वामींची आरती घेण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला.. स्वामींचे डोळेभरून दर्शन घेतलं."
अतुल शेवटी लिहितो, "पुढे अक्कलकोट देवस्थानचे आदरणीय ट्रस्टी कडून सत्कार झाला ते ही स्वामींच्या गाभाऱ्याजवळ.. खूप भावनिक क्षण अनुभवून पोहचलो कार्तिकी एकादशीच्या दिवसाचा स्वामींचा आशीर्वादरुपी महाप्रसाद घ्यायला.. स्वामींच्या नामाचा गजर करत आम्ही सर्व स्वामी भक्तांनी अमृततुल्य प्रसाद ग्रहण केला आणि या अनुभवासाठी स्वामींचे आभार मानून निघालो गाणगापूर दर्शनासाठी.. श्री स्वामी समर्थ." काही महिन्यांपूर्वी अतुलला ब्रेन हॅमरेजचं निदान झालं होतं. त्यातून सावरत आता अतुल पुन्हा एकदा कामात सक्रीय होतोय.