Join us

"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 4:35 PM

करोना काळात भूषणच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर भूषणने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवलं होतं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. या काळात आत्महत्येचा विचार मनात आल्याचा खुलासाही त्याने केला. 

अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमधून अभिनेता भूषण कडूने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भूषणने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवणारा भूषण मात्र पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेला होता. करोना काळात भूषणच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर भूषणने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवलं होतं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. या काळात आत्महत्येचा विचार मनात आल्याचा खुलासाही त्याने केला. 

भूषण म्हणाला, "सगळं छान सुरू असताना लॉकडाऊन आणि करोना आला. कोव्हिडमध्ये माझ्या पत्नीचं निधन झालं. बायकोच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला होता. ११ वर्षाच्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी होती. अचानक हे सगळं घडल्यानंतर मी थोडासा हललो. कारण, कलाकार हा संवेदनशील असतो. कोव्हिडनंतर जेव्हा सगळं सुरू झालं होतं. तेव्हा कादंबरीने या जगाचा निरोप घेतला. माझं सगळं मॅनेजमेंट माझी बायको सांभाळायची. सकाळी उठल्यावर मला कामासाठी कुठे जायचंय, हेदेखील मी तिला विचारायचो. एका बायकोच्या जाण्याने मला एवढा हादरा बसतो. जेव्हा एखाद्या बाईचा नवरा तिला सोडून जातो, तेव्हा त्या बाईचं काय होत असेल. याची मला कल्पना आली. बायकोचं महत्त्व मला कळून चुकलं. त्यानंतर मी स्वत:ला पडद्याच्या मागेच ठेवलं होतं. मुलाची जबाबदारी होती. पण, स्वत:ला समजावून देखील दु:ख कमी होत नव्हतं. बायको गेल्यानंतर काही सुचत नव्हतं. हातात कामं नव्हती.आर्थिक चणचण होती. एकुलत्या एका मुलाच्या इच्छा मी पूर्ण करू शकत नव्हतो. तेव्हा एक वडील म्हणून वाईट वाटायचं". 

"मला हे सगळं सहन होत नव्हतं. बायको गेल्यानंतर मी स्वत:ला संपवण्याचं ठरवलं होतं. मी सुसाइड नोटही लिहायला घेतली होती. पण, सुसाइड नोट लिहून संपतच नव्हती. मुलाबद्दल, बायकोबद्दल, मित्रमंडळी, प्रेक्षक, सुख-दु:ख सगळं मांडायचं होतं. मी रोज सुसाइड नोट लिहायला बसायचो. पण, ती संपतच नव्हती. एकदा किरणा मालाचं सामान घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. पाऊस पडत होता. दुकानदाराला छत्रीची किंमत विचारली. त्याने ३५० रुपये सांगितली. पण, तेवढेही पैसे माझ्याकडे नव्हते. त्या दुकानात उभं असतानाच पाठीमागून कोणीतरी विचारलं की तू भूषण कडू ना? तुमचं काम बघतो आम्ही खूप चांगलं काम करता, असं ते म्हणाले. त्या ४-५ माणसांमध्ये स्वामी समर्थांच्या ठाण्यातील मठाचे मठाधिपती होते. कडू तुम्ही चांगले कलाकार आहात, असं वागू नका. असं ते मला म्हणाले. दुसऱ्या दिवशी मी स्वामींच्या मठात गेलो. त्यानंतर त्या मठाधिपतींनी माझं ब्रेनवॉश करायला सुरुवात केली. मग चांगले विचार माझ्या डोक्यात येऊ लागले. त्यांनी मला पैशाची मदतही केली. हळूहळू माझं सुसाइड नोट लिहिणं कमी झालं. आत्महत्येचा विचार निघून गेला. त्यानंतर ठरवलं आता जगायचं. आर्थिक गरजेसाठी आणि या चांगल्या लोकांसाठी पुन्हा काम करायचं ठरवलं," कठीण काळाबद्दल सांगताना भूषण भावुक झाला होता.   

टॅग्स :भूषण कडुमराठी अभिनेतासेलिब्रिटी